Select Page

॥ ज्योतिबांचे फेडू उपकार ॥

ही कविता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्यास समर्पित करतो…

 

असे जगावे भारतभूमीवर, सत्याचे लावुन अत्तर,

नजर रोखुनी अज्ञानावर, ज्योतिबांचे फेडू उपकार..!!

 

नको गुलामी ज्योतिषाची, भीती खोट्या ताऱ्यांची,

विद्येसाठी झगडतानाही, लाज नसावी काबाड कष्टाची..

अशी दांडगी जिद्द ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,

नजर रोखुनी अज्ञानावर, ज्योतिबांचे फेडू उपकार..!!१!!

 

पाय रोवुनी चिखलामध्ये, सावित्रीने ज्ञान देताना,

हसू असावे ओठांवरती, शेण अंगावर घेताना…

संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर,

नजर रोखुनी अज्ञानावर, ज्योतिबांचे फेडू उपकार..!!२!!

 

शूद्रादि-शूद्र होते जे कोणी, त्यांना तुम्हीच ‘माणूस’ केले,

पाण्याचेही तळे खुले करून, धर्मालाही हादरविले..

‘शेतकऱ्याचा आसूड’ हाती, घेता पळती सारे सत्वर,

नजर रोखुनी अज्ञानावर, ज्योतिबांचे फेडू उपकार..!!३!!

 

करून जावे असेही काही, जीवन सोडून जाताना,

अभिमान वाटावा ‘ज्योतिबांना’, निरोप शेवटचा देताना..

स्वर कठोर त्या अन्यायाचा, क्षणभर व्हावा कातर-कातर,

नजर रोखुनी अज्ञानावर, ज्योतिबांचे फेडू उपकार..!!४!!

© Copyrights

 

✒️ लेखक – सुभाष बडे सर 

संस्थापक: शाबास गुरुजी एज्युकेशन