॥ संविधानाचे देणे – यामुळेच आमचे जिणे॥
_ही कविता संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समिती टीम मध्ये योगदान देणाऱ्या सर्वांना आजच्या संविधान दिनी समर्पित_
अरे संसार संसार, होता विषमतेचा घाणा,
माझ्या भीमाईने त्यात, पेरला समतेचा दाणा.
कष्टाच्या घामाने आणि शाईच्या थेंबाने,
नव्या भारताचे स्वप्न विणले, बाबासाहेबांच्या हाताने. ||ध्रु||
होती गरिबाची ‘खोपडी’ आणि श्रीमंताची ‘माडी’,
कायद्याने आज, एका रेषेत आणली गाडी.
नाही कुणी राजा आता, नाही कुणी दास,
संविधानाच्या पानांत, घेतला मोकळा श्वास.
बाबासाहेब तुम्ही, आणि सोबतीला ‘समिती’,
लिहून ठेवलीत तुम्ही, माणसाच्या जगण्याची ‘निती’. ||१||
जसा आभाळाचा हात, साऱ्या रानोमाळी सारखा,
तसा तुमचा कायदा, नाही कुणी त्यात पारखा.
जात-पात-धर्म, याची तोडली हो ‘काठी’,
न्याय उभा केला तुम्ही, सामान्य माणसासाठी.
अरे सोन्याच्या ताटात, किंवा मातीच्या माठात,
हक्क वाढला समान, त्याचा घास सर्वांच्या ओठात! ||२||
पण नुसतेच हात जोडून, कसे फिटतील हे उपकार?
आता डोळस होऊन, आम्ही बनू पहारेदार.
स्वातंत्र्य मिळाले, म्हणून स्वैर नाही वागायचे,
हक्क मागत असताना, कर्तव्यही जगायचे.
ही लोकशाहीची ‘वहिवाट’, होऊ नये सपाट
तिला जपावे लागेल, तिच्याकडे करु नका पाठ ||३||
आम्ही खातो आज शपथ, तुमच्या त्या कष्टाची,
नजर वाकडी होऊ देणार नाही, लोकशाहीच्या पृष्ठाची.
संविधान हेच शस्त्र, आणि संविधान हीच ढाल,
तुम्ही दिलेल्या प्रकाशाने, उजळवू भविष्यकाळ.
संविधान तुमचे देणे, अन हेच आमचे जीवन गाणे,
तुमच्या ऋणात राहून, आम्ही झालो आता शहाणे! ||४||
✒️ लेखक – सुभाष बडे सर
संस्थापक: शाबास गुरुजी एज्युकेशन